सोमवारी शाळा, कॉलेज उघडणार की नाही?, राज्य सरकारने निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला!

0
312

मुंबई मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनच घेणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद आहेत. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनानंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने सात महिन्यानंतर राज्यातील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येताच शालेय शिक्षण विभागाने सावधगिरीची पाऊल टाकत राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा चेंडू स्थानिक प्रशासनाच्या कोर्टात टाकला आहे.

ज्या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे, त्या ठिकाणी २३ नोव्हेंबरला स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

ऑनलाइन शिक्षण सुरुच राहणारः प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाइन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निणय घेतला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णः दरम्यान, राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या आसपास होती. आज सायंकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ६४० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा