आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन, एक लाख रुपयांचे पारितोषिक

0
38
बालेवाडी क्रीडा संकुलाचे संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून या स्पर्धेत पात्र प्रवेशिकेला एक लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. आकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह ३१ ऑक्टोबरपूर्वी isumharashtra@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. या स्पर्धेची अधिक माहिती https://sports.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. 

ऑगस्ट महिन्यात बोधचिन्ह  स्पर्धा घेण्यात आली होती. योग्य प्रवेशिका प्राप्त न झाल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करून उत्तम क्रीडा मार्गदर्शक तयार करणे, क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञान यामाध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या सहभागाच्या दृष्टीने नियम व अटी साठी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.

स्पर्धेचे नियम व अटी अशाः

निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह सादर करणाऱ्या प्रवेशिकेस रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. बोधचिन्ह स्वीकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील. बोधचिन्ह पाठवताना कोरल ड्रॉ, Psf, JPEG स्वरुपात पाठवावे. बोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नाव, क्रमांक किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल. बोधचिन्ह तयार करताना ते मूळ स्वरूपात व स्वतः तयार केलेला असावा.

स्पर्धकाने बोधचिन्ह डिझाईन पाठवताना त्याचे नाव, निवासाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व आपला ई-मेल पाठवण्यात आलेल्या ई मेलमध्ये नमूद करावा. बोधचिन्ह पाठवतांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com या ई मेल वर पाठवावा. अन्य ई-मेलवर पाठवण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी ९७३०२००६५६ या क्रमांकावर उदय पवार, तालुका क्रीडा अधिकारी, पुणे, यांना संपर्क करावा.

या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीज, डिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह क्रिएटिव्ह असावा. सेल्फ मेड असावे. त्यात रचनात्मकता असावी. तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मूळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभागी होता येईल. बोधचिन्ह ए-फोर साईझ कागदावर असावे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिशन संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठणे असून क्रीडा विद्यापीठाचा दृष्टिकोन हा खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे हा आहे. क्रीडा विद्यापीठाचे ध्येय हे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे असे आहे.

क्रीडा विद्यापीठाची उद्दिष्टे:

  • भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे.
  • क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे.
  • प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे.
  • क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे.
  • क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.
  • आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे,
  • समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे.
  • खेळाडू क्रीडा तज्ञ, कीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा