हिमायतनगरः कामारवाडीत अविवाहित प्रियकर व विवाहित प्रेयसीची एकत्र गळफास घेऊन आत्महत्या

0
270
प्रातिनिधिक छायाचित्र.

नांदेडः हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना घडली. अविवाहित प्रियकर आणि विवाहित प्रेयसीने एकमेकासोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. परंतु दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध असल्यामुळे या प्रेमी युगलाने हे टोकाचे पाऊल उचलले.

 कामारवाडीतील अविवाहित दत्ता आणि विवाहित शारदा यांच्यात प्रेमसंबंध होते. नवऱ्याशी पटत नसल्यामुळे विवाहित शारदा चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडीलाच रहात होती. या वास्तव्यात तिचे दताशी सूत जुळले आणि दोघांचे प्रेम फुलत गेले.

 दोघांचे प्रेम बहरत असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. शारदा विवाहित असल्यामुळे दत्ताच्या घरच्यांनी दोघांच्या प्रेमसंबंधाला टोकाचा विरोध केला आणि दत्ताचे लग्न दुसऱ्याच मुलीशी करण्याचा चंग बांधून त्याची सोयरिकही जुळवून आणली होती.

घरच्यांची लगीन घाई सुरू असली तरी दत्ताने मात्र शारदासोबतच जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. दत्ताचे लग्न झाल्यानंतर दोघांना एकमेकांपासून दूर व्हावे लागणार ही कल्पनाच या प्रेमी युगलाला सहन झाली नाही. त्यामुळे दोघांनीही सोबतच मरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी पहाटे गावाशेजारीच असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन दोघांनीही एकत्रच आत्महत्या केली.

 ही घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडीचे पोलिस पाटील नागोराव भिंगारे यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. विशेष म्हणजे दत्ता आणि शारदाच्या विवाहाला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनी दोघांना एकाच चितेवर अग्नी दिला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार हेमंत चोले करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा