नववर्षाचा पहिलाच दिवस महागाईचाः एलपीजी सिलिंडर 19 रुपयांनी महाग, रेल्वे प्रवासही महागला!

0
73
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांनी वाढ केली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही 33 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेनेही नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक श्रेणीचे प्रवास भाडे प्रतिकिलोमीटर दोन ते चार पैशांनी वाढवल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा खड्डा पडणार आहे.

 गेल्या वर्षीच्या मे-जून महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नव्या दरवाढीमुळे 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर दिल्लीत 714 रुपयांना झाला आहे. मुंबईतील ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी आता 684 रुपये 50 पैसे मोजावे लागतील. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजी गॅसच्या किंमतींवरही परिणाम झाल्याचे कारण सांगत पेट्रोलियम कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे. सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 अनुदानित सिलिंडर देण्यात येतात. त्यानंतरचा प्रत्येक गॅस सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागतो.दुसरीकडे व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडरही 33 रुपयांनी महागल्यामुळे छोटे व्यापारी अडचणीत आले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक दरवाढ करण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र स्थिर ठेवल्या आहेत.

रेल्वेचे प्रवास भाडेही महागलेः रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवास भाड्याची दरवाढ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून लागू केली आहे. लांब पल्ल्याच्या सर्वसाधारण गाड्यांच्या प्रवासदरात प्रतिकिलोमीटर एक पैसा, बिगर वातानुकुलित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेच्या प्रवासदरात प्रतिकिलोमीटर दोन पैसे आणि वातानुकुलित मेल-एक्स्प्रेसच्या प्रवासदरात प्रतिकिलोमीटर चार पैसे वाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई- नागपूर सर्वसाधारण रेल्वे प्रवासाठी 8 रुपये 16 पैसे जास्तीचे मोजावे लागतील. तर वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना 32 रुपये 64 पैसे जास्तीचे मोजावे लागतील.या प्रवासदरवाढीची झळही सर्वसामान्य प्रवाशांना सोसावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा