एलपीजी गॅस सिलिंडर वितरणासाठी नवी प्रणाली, ऑथेंटिकेशन कोडशिवाय मिळणार नाही सिलिंडर!

0
384
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः घरगुती गॅस सिलिंडरच्या घरपोच सेवेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी भारतातील एलपीजी गॅस उत्पादक कंपन्यांनी डीसीए म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड ही नवी प्रणाली विकसित केली असून तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर आलेला डीसीए दिल्याशिवाय यापुढे तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार नाही.

 घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या वितरणात आणखी पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक डीसीए म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड पाठवला जाईल. डिलिव्हर बॉय गॅस सिलिंडर घेऊन आल्यानंतर तो कोड तुम्हाला त्याच्याशी शेअर करावा लागेल. तो मॅच झाला तरच तुम्हाला गॅस सिलिंडर दिला जाणार आहे.

 भारतात हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून एलपीजी गॅसची निर्मिती आणि वितरण केले जाते. या कंपन्यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. सध्या ती प्रायोगिक तत्वावर सध्या जयपूरमध्ये ही प्रणाली राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून देशातील १०० स्मार्ट सिटीजमध्ये ही योजना लागू केली जाणार असून भविष्यात संपूर्ण देशात ही प्रणाली राबवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

नव्या प्रणालीनुसार गॅस सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून गॅस एजन्सीकडे तुमचा निवासाचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक अपडेट नसेल तर तो आताच करून घ्या. डिलिव्हरी बॉयकडील मोबाइल ऍपमध्येही तुम्हाला तुमची माहिती अद्ययावत करता येऊ शकते. गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई-बेंगळुरूसारख्या मोजक्याच शहरात गॅस पाईपद्वारे गॅस पुरवला जातो. ही बोटावर मोजण्याइतकी शहरे सोडली तर देशातील मोठा ग्राहक वर्ग अजूनही गॅस सिलिंडरच वापरतो. या गॅस सिलिंडरच्या वितरणात होणारी हेराफेरी आणि काळा बाजार या नव्या प्रणालीमुळे थांबेल, अशी या कंपन्यांची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा