‘ल्युडो’ हा गेम कौशल्याचा की नशिबाचा? वाद न्यायालयात

0
40
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ल्युडो हा मोबाइल गेम कौशल्यावर आधारित खेळ नसून तो नशिबाचा खेळ आहे. त्याला जुगाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे, असा दावा करत ल्युडो सुप्रीम ऍप या मोबाइल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत ल्युडो हा गेम कौशल्याचा की नशिबाचा?  त्याला जुगार प्रतिबंधक कायदा लागू होतो का?  अशी विचारणा करत राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ल्युडो हा गेम पैसे लावून खेळला जात आहे. त्याला जुगाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा गेम जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३,४ आणि ५ नुसार गुन्हा ठरतो, असा दावा करत या ऍपची मालकी असलेल्या कॅशग्रेल कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मनसे पदाधिकारी केशव मुळे यांनी याचिकेत केली आहे.

न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

 ल्युडोचा गेम हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळला जातो. त्यामुळे या गेमला कौशल्याचा खेळ म्हणता येणार नाही. ल्युडो सुप्रीम ऍपद्वारे हा गेम पैज लावून खेळला जातो, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा