मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या १९ मंत्री- आमदारांचे राजीनामे, कमलनाथ सरकारचे भवितव्य अधांतरी

1
231
संग्रहित छायाचित्र.

भोपाळ/ नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये सन्मान मिळत नसल्यामुळे नाराज होऊन ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या १९ मंत्री आणि आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असून काँग्रेसमध्ये केलेल्या बंडखोरीची बक्षिसी म्हणून त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.

 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या १९ मंत्री आणि आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यात मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ट्विट करून स्वतःच राजीनाम्याची घोषणा केली. या राजीनाम्यावर ९ मार्च अशी तारीख लिहिलेली आहे. याचाच अर्थ काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिंदे यांनी आधीच घेतला होता आणि भाजपबरोबर त्यांचे सर्वकाही आधीच ठरलेले होते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचाः ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसचा राजीनामा, मध्य प्रदेशतील कमलनाथ सरकार धोक्यात

 ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्यावर त्यांना राज्यभेची उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही मंत्रिपद दिले जाऊ शकते. शिंदेंच्या नेतृत्वात मध्य प्रदेशात काँग्रेसविरुद्ध बंड करणार्या काँग्रेस आमदारांना भाजपच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर सामील करून घेण्याचे आश्वासनही भाजपने दिले असल्याचे सांगितले जाते.

बंडखोरी करणाऱ्या शिंदे समर्थकांना दुसऱ्यांदा निवडणूक लढवावी आणि जिंकावी लागणार आहे, हे निश्चित आहे. परंतु या निवडणुकीत ते जिंकू न शकलेल्या आणि निवडणूक लढवण्यास इच्छूक नसलेल्या  आमदारांनाही सत्तेत भागीदारी देण्यास भाजपने सहमती दर्शवली असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचाः १९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?

दरम्यान, आज घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीच्या दोन तासांनंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाचीही बैठक होणार आहे. भोपाळमध्ये होणाऱ्या या बैठकांकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा