ज्योतिरादित्य शिंदे यांचे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत जाणे ही त्यांची ‘घर वापसी’?

0
491
संग्रहित छायाचित्र.

प्रमिला सुरेश/ नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मित्र, मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्रिपद उपभोगलेले आणि काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाजपमध्ये जाणे ही त्यांची ‘घरवापसी’ असेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्योतिदित्य यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या प्रश्नाला तोंड ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या  आणि भाजप नेत् यशोदाराराजे शिंदे यांनीच फोडले आहे. ज्योतिरादित्य यांनी ‘राष्ट्रहित’ लक्षात घेऊन हे पाऊल उचलले आहे  आणि ही त्यांची ‘घर वापसी’ आहे, असे यशोदाराजे शिंदे यांनी म्हटले आहे. राजमाता विजयाराजे शिंदे यांनी जनसंघ आणि भाजप भक्कम करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे, असे सांगतानाच ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी ज्योतिरादित्य यांचे स्वागत केले आहे, त्यावरून राजमाताबद्दल असलेला या नेत्यांतील आदर दिसला. शेवटी कोणत्याही व्यक्तीला सन्मान हवा असतो, असेही यशोदाराजे यांनी म्हटले आहे. माधवराव शिंदे ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवत होते आणि त्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या विरोधात भाजप मोठा उमेदवार रिंगणात उतरवत नव्हती, असेही यशोदाराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेस सरचिटणीसपद दिल्यावर राहुल गांधींनी दिली होती स्वतः बसायची जागा

विशेष म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी विजयाराजे शिंदे भाजपमध्ये होत्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. त्यांच्या दोन मुली यशोदाराजे आणि वसुंधराजे शिंदे या दोघीही भाजपमध्ये आहेत. वसुंधराराजे राजस्थान भाजपच्या वजनदार नेत्या आहेत आणि त्यांनी दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. यशोदाराजे शिंदेही भाजपच्या आमदार आहेत.

हेही वाचाः १९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?

मात्र विजयाराजे शिंदे यांचे पुत्र आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडिल माधवराव शिंदे हे इंदिरा गांधी यांचे चिरंजिव संजय गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मित्रांपैकी एक होते. ते काँग्रेसच्या तिकिटावर ९ वेळा खासदार झाले आणि अनेकदा त्यांनी मंत्रिपदही उपभोगले. माधवराव शिंदे आणि त्यांची आई विजयाराजे शिंदे यांचे कधीच फारसे जमले नाही. त्याचे कारण कौटुंबिक वारश्याचा संघर्ष तर होताच शिवाय राजकीय संघर्षही होता. विजयाराजे शिंदे यांनी आपल्या पोटचा मुलगा माधवराव शिंदे यांच्याविरोधात निवडणूक प्रचारही केलेला आहे.

 असे असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये सक्रीय असलेल्या आपल्या दोन्ही आत्यांना सार्वजनिकरित्या कधीही विरोध किंवा टिकाटिप्पणी केली नाही. त्यांचे या दोन्ही आत्यांशी सलोख्याचे संबंध होते, असे मानले जाते. परंतु भाजपचा हिंदुत्ववादी अजेंडा ज्योतिरादित्य शिंदे यांना कितपत पचनी पडेल यावरच त्यांचे भाजपमध्ये जाणे ही त्यांची ‘घर वापसी’ असेल की नाही, हे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा