नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अस्थिर झाल्याचे चित्र असले तरी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका गांधी यांच्यावर सरचिटणीसपदाची धुरा सोपवल्यानंतर ते स्वतः काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना काँग्रेस मुख्यालयात ज्या जागेवर बसत होते, ती जागा ज्योतिरादित्य शिंदे यांना बसण्यासाठी दिली होती, अशी माहिती अशी समोर आली आहे.
हेही वाचाः १९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?
मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासूनच ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद देण्यात आले आणि पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याचवेळी राहुल गांधींनी त्यांची बहीण प्रियंका गांधींनाही काँग्रेसचे सरचिटणीसपद देऊन उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली होती. या दोन्हीही काँग्रेस सरचिटणीसांना काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना ज्या खोलीत ते बसत होते, तीच खोली देण्यात आली होती. याचाच अर्थ गांधी कुटुंब ज्योतिरादित्य शिंदेंना आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत होते आणि कुटुंबाचा सदस्य म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस फोडण्याबरोबरच सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांचा विश्वास आणि भ्रमही तोडून टाकला आहे.
हेही वाचाः मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे, कमलनाथ सरकारकडे उरले केवळ ९२ आमदार
शिंदे राजघराण्याचा इतिहास पाहिला तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपशी जवळीक करणे तसे नवीन नाही. परंतु त्यांनी असे अचानक बंडखोरी करणे ही राहुल गांधी यांच्यासाठी धक्कादायक बाब आहे.