मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा; शिवराजसिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर प्रबळ दावेदार

1
592
संग्रहित छायाचित्र.

भोपाळः ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशात ‘कमल’ नाथ करण्याचे ऑपरेशन लोटस यशस्वी होऊ लागल्याचे दिसताच भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेसचे कमलनाथ सरकार पडण्याच्या आधीच सुरू झालेल्या चढाओढीत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची नावे आघाडीवर आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार अस्थिर झाल्याचे दिसू लागले आहे. ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे ऐन धुळवडीच्या दिवशी भाजपच्या गोटात रंग भरले आहेत. शिंदे समर्थक मंत्री आणि आमदारांनीही बंडखोरी केल्यामुळे कमलनाथ सरकार पडले आणि भाजपने सरकार स्थापन केले तर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण? असा प्रश्न भोपाळपासून दिल्लीपर्यंत विचारला जाऊ लागला आहे. त्यात शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्रसिंह तोमर या दोघांची नावे आघाडीवर आहेत.

हेही वाचाः १९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?

 कमलनाथ सरकार अस्थिर करून पुन्हा भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी मध्य प्रदेश भाजपचे अनेक नेते गेल्या अनेक दिवसांपासून ‘परिश्रम’ घेत आहेत. असे ‘परिश्रम’ घेणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे नाव सर्वात वरच्या स्थानी आहे. काँग्रेस, बसप, समाजवादी पक्ष आणि अपक्ष उमेदवार फोडण्यात माजी मंत्री नरोत्तम मिश्रा आणि भूपेंद्रसिंह हे दोघेही खूपच ‘परिश्रम’ घेत आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही सत्तेत पुन्हा परतण्यासाठी शक्य त हातखंडे वापरले आहेत.

हेही वाचाः ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसचा राजीनामा, मध्य प्रदेशतील कमलनाथ सरकार धोक्यात

आणखी वाचाः मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या १९ मंत्री- आमदारांचे राजीनामे, कमलनाथ सरकारचे भवितव्य अधांतरी

या एकूणच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणारांची यादी मोठी असली तरी भाजप श्रेष्ठींची नजर दोन-तीन नेत्यांभोवतीच घुटमळताना दिसते आहे. मध्य प्रदेशात १३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान या पदासाठीचे तगडे दावेदार मानले जात आहेत. नरोत्तम मिश्रा यांनी मागील १४ महिन्यांत जी भूमिका निभावली आहे, ती पाहता तेही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमरही मुख्यमंत्रिपदासाठीचे राखीव दावेदार आहेत. भाजपकडून ऐनवेळी या पदासाठी त्यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. तोमर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत विश्वासूंपैकी एक आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्या तुलनेत तोमर यांचे आरएसएसमध्येही मधुर संबंध आहेत.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा