मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे, कमलनाथ सरकारकडे उरले केवळ ९२ आमदार

0
581
संग्रहित छायाचित्र.

भोपाळः चौदा महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या कमलनाथ सरकारची सद्दी आता संपल्यात जमा असून काँग्रेसच्या २२ आमदारांनी त्यांचे राजीनामे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यामुळे कमलनाथ सरकारकडे आता केवळ ९२ आमदार राहिले आहेत. २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत प्राप्त परिस्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला किमान १०४ आमदारांची आवश्यकता आहे. दुसरीकडे भाजपकडे स्पष्ट बहुमतासाठी लागणारे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ आपल्या पदाचा राजीनामा देऊन विधानसभा विसर्जित करण्याची आणि नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करतील अशी शक्यता आहे.

मध्य प्रदेशात गेल्या आठवडाभरापासून चाललेल्या राजकीय शह-काटशहाच्या राजकारणाने आज नाट्यमय वळण घेतले. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक २२ आमदारांनीही त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे सोपवले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारकडे आता केवळ ९२ आमदार उरले आहेत.

हेही वाचाः मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा; शिवराजसिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर प्रबळ दावेदार

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे विधानसभेची सदस्य संख्या आता २०६ वर आली आहे. अशा स्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी  १०४ आमदारांची आवश्यकता भासेल. काँग्रेसला अपक्ष आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या आमदारांनीही साथ दिली तरी बहुमताचा आकडा गाठणे कठीण दिसत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडे १०७ आमदार आहेत. काँग्रेसचे आणखी १० ते १२ आमदार राजीनामे देऊ शकतात, असा भाजपच्या सूत्रांचा दावा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा