१९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?

1
1773
संग्रहित छायाचित्र.

भोपाळ/ नवी दिल्लीः  काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकारविरुद्ध बंडाचे निशाण फडकावल्यानंतर मध्य प्रदेशात १९६० च्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? कमलनाथ सरकारचे दिवस भरले आहेत का? कमनाथ सरकार आता वाचू शकणार नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न मध्य प्रदेशच्या राजकारणात कल्ला करू लागले असून त्याचे पडसाद संपूर्ण देशाच्याच राजकारणात उमटू लागले आहेत.

कमलनाथ सरकारविरुद्ध त्यांच्याच पक्षातील वजनदार आणि महत्वाकांक्षी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्या या बंडामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार काँग्रेसकडूनच पाडले जाण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे.

मध्य प्रदेशच्या राजकीय इतिहासात एक अतिशय रंजक घटना आहे. १९६० मध्ये तेथे द्वारकाप्रसाद मिश्र यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार होते. संख्याबळाच्या हिशेबाने मिश्र यांचे सरकार कमलनाथ सरकार सारखेच दुबळे होते. मुख्यमंत्री मिश्र यांच्यावर शिंदे राजघराण्याच्या प्रमुख आणि जनसंघाच्या वजनदार नेत्या विजयाराजे शिंदे यांची खप्पा मर्जी झाली होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेस नेते गोविंद नारायण सिंह यांना सोबत पक्षात बंड घडवून आणले होते. या बंडामुळे द्वारकाप्रसाद मिश्र सरकार पडले होते. विजयाराजे शिंदे यांच्या राजकीय रणनितीमुळेच जुलै १९६७ मध्ये मध्य प्रदेशात गोविंद नारायण सिंह यांच्या नेतृत्वातील संयुक्त विधायक दलाचे सरकार स्थापन झाले होते आणि ते दोन वर्षे चालले होते.

हेही वाचाः ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसचा राजीनामा, मध्य प्रदेशतील कमलनाथ सरकार धोक्यात

मध्य प्रदेशात तेव्हा गोविंद नारायण सिंह यांनी बंड केले होते आणि आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केले आहे. मध्य प्रदेशात १५ वर्षांच्या राजकीय वनवासानंतर डिसेंबर २०१८ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले. या सरकार पहिल्याच दिवसापासून संकटाचे ढग घोंगावू लागले होते. परंतु सर्व काही आलबेल असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात होते. सरकार स्थापन झाल्यानंतर काही लिटमस टेस्टमध्ये कमलनाथ आणि काँग्रेस यशस्वी  झाली. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक काँग्रेसने जिंकल्यामुळे कमलनाथ सरकारला थोडे बळ मिळाले. विधिमंडळात भाजपवर कुरघोडी करण्याचे काँग्रेसचे काही प्रयत्नही यशस्वी झाले.

भाजप संधीच्याच शोधात होती. त्यातच मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही दिले जात नसल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे अस्वस्थ होते. त्यातच त्यांना राज्यसभेच्या उमेदवारीपासूनही दूर ठेवले गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनी आपली ‘ताकद’ दाखवून दिली आणि मध्य प्रदेशच्या राजकीय इतिहासात १९६० मध्ये काँग्रेसनेच काँग्रेसचे सरकार पाडले होते, त्याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा