राज्यात पुन्हा महाआवास अभियानः ग्रामीण भागात चार महिन्यांत मिळणार पाच लाख घरकुले

0
10
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ‘महा आवास अभियान –ग्रामीण’ राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या अभियान कालावधीत पाच लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार असून विविध शासकीय योजनांच्या कृतीसंगमातून लाभार्थ्यांचे जीवनमान देखील उंचावण्यास मदत होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविण्यात आलेले महाआवास अभियान यशस्वी झाल्याने यावर्षीही २० नोव्हेंबर या ‘राष्ट्रीय आवास दिना’चे औचित्य साधून महाआवास अभियान २०२१-२२ राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे १०० टक्के मंजुरी देणे, पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊसेस, विविध शासकीय योजनांशी कृती संगम इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या अभियानात बहुमजली गृहसंकुले, भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक, वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक, वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन, किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जा साधन व नेट बिलिंगचा वापर इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीस राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्राम पंचायत स्तरावरुन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा