महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत नोकरी भरतीच्या परीक्षांना स्थगिती : मुख्यमंत्री ठाकरे

0
391
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत नोकरभरतीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. एकदा या त्रुटी दूर झाल्या की या परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच घेण्यात येतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची नोकर भरतीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

शासकीय नोकरभरतीसाठी फडणवीस सरकारने सुरू केलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 1 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. महापोर्टल सेवेत पारदर्शकता नाही, अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतो, म्हणून हे पोर्टल बंद करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. महापरीक्षा पोर्टलबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे अनेक तक्रारीही येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक घेतली.या बैठकीत शासकीय नोकर भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांबाबत चर्चा झाली. महापरीक्षा पोर्टलबाबत तक्रारी, समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभर बैठका घेण्यात येतील. त्यांचे याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. त्यामुळे पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचरपदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलव्दारेच ऑनलाइन घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा