पुणे-मुंबईसह सहा शहरांतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम आज मध्यरात्रीपासून बंदः मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
249
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात कोरोना बाधित १७ रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या सहा शहरांतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, जीम  आज मध्यरात्रीपासूनच पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन केले. त्यात त्यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. राज्यात १७ रूग्ण आढळून आले असले तरी त्यांच्या कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. यापैकी १० रुग्ण पुण्यातील आहेत. राज्यात कोरोनाचा फैलाव नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून चित्रपटगृहे, जिम, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले.

असे मानले जाते की, उपचारापेक्षा काळजी घेणे जास्त चांगले आहे. त्यासाठी राज्य सरकार अधिसूचना काढत आहे. बस, रेल्वे यासारख्या अत्यावश्यक सेवा बंद करता येणार नाहीत. पण आमचे जनतेला आवाहन आहे की, गर्दी टाळा, वेळेवेळी साबणाने हात धुवा, हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करा उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

स्पर्धा, मेळावे, सभांच्या परवानगी रद्दः क्रीडा स्पर्धा, सभा, मेळावे आणि समारंभ असे गर्दी होणारे कार्यक्रम घेऊ नये. अशा प्रकारच्या कोणत्याही राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्य सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. ज्या कार्यक्रमांना आधीच परवानगी देण्यात आली आहे, ती रद्द करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. खासगी कंपन्यांनीही शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची सुविधा द्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 दहावी- बारावीच्या परीक्षा सुरूच राहणारः राज्यात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरूच राहतील. मात्र पहिली ते ९ वीपर्यंतच्या परीक्षांबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा