अब की बार, ठाकरे सरकार!: उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री, 1 डिसेंबरला शिवतिर्थावर शपथविधी!

0
52

मुंबईः आपल्या खास ठाकरी शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणाऱ्या ठाकरे घराण्यातील तिसर्‍या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे हे महाराष्ट्राचे 28 वे आणि आजवर थेट सत्तेपासून अलिप्त राहून राजकारणाचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवणाऱ्या ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री असतील. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या नेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. आता ठाकरे सरकारचा शपथविधी येत्या 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवतिथावर होणार आहे.

 मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे, असा ठराव मांडला.या ठरावाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर तिन्ही पक्षाच्या आमदारांनी हा ठराव एकमताने मंजूर केला.

हेही वाचा: मी 79 तासांतच पुन्हा गेलो: देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, सरकार कोसळले!

 एका कुटुंबासारखे काम करू: उद्धव ठाकरे : नेतेपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना संबोधित केले. आपले सरकार एका कुटुंबासारखे काम करेल. जनतेला हे सरकार आपले वाटेल, असे काम करून दाखवेल. आपण चांगला आणि सुस्कृंत महाराष्ट्र घडवू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू. माझे सरकार कोणाशीही सूडबुद्धीने वागणार नाही, पण कुणी आडवे आले तर त्याला बघून घ्यायला माझे वाघ तयार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज बाळासाहेब हवे होते : शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळाही दिला. आज बाळासाहेब असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बाळासाहेब माझ्यावर टीका करायचे. मीही त्या टिकेला उत्तर द्यायचो. दिवसा जाहीर सभांत एकमेकांचा समाचार घेतला की संध्याकाळी आम्ही एकत्र यायचो, असे शरद पवार म्हणाले. आमच्या मैत्रीत राजकारण कधीच आडवे आले नाही, असेही पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा