…पण जनतेच्या मनातील असंतोष कसा दाबणार?

0
104
प्रतिकात्मक छायाचित्र.

न्यूजटाऊन संपादकीय टीम

विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. मराठवाडा- विदर्भातील दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या वेळी परदेश वाऱ्यांत मग्न असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे गृहमंत्री अमित शाह आणि शत प्रति शत भाजप मते मागण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370, तीन तलाकच्या मुद्द्यांवर प्रत्येक सभांमधून बोलत आहेत. जणू काही काश्मिरातील कलम 370 रद्द केल्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ संपणार आणि सगळे काही आबादी- आबाद होणार अशा अविर्भावात मैदानत गाजवत आहेत. अशातच हे महाराष्ट्राचे प्रश्न नाहीत. दुष्काळ,शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, घसरलेली अर्थव्यवस्था या आणि अशा मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या न्यूजटाऊनसह काही न्यूजपोर्टलचे फेसबुक पेजेस ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यांना फेसबुक पेजेसवर लिंक शेअर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जमाना पॅकेजेसचा आहे. पॅकेजेस देऊन टीव्हीचे पडदे आपले करून घ्यायचे आणि रात्रंदिवस त्या पडद्यावर आपलीच छबी झळकत राहील, याची खबरदारी घ्यायची. हा एक नवा फंडा शोधून काढण्यात आला आहे. असे केले की मूळ प्रश्न बाजूला पडतात. लोकांचे त्याकडे लक्षच जाऊ दिले जात नाही. जे टीव्हीच्या पडद्यावर दिसते तेच वास्तव आहे, असा आभास निर्माण होतो. असा आभास निर्माण करण्यात यापूर्वीच्या दोन लोकसभा आणि महाराष्ट्राच्या एक विधानसभा निवडणुकीत ठराविक नेते आणि ठराविक राजकीय पक्ष यशस्वी झाल्याचे आपण पाहिले आहे. पण आधुनिक युगातील काही माध्यमे अशांना भूलत नाहीत. झुकत नाहीत. वाकत नाहीत. भारताच्या संविधानाची भूमिका हीच त्यांची भूमिका असते. दबलेल्या, पिचलेल्या, आधार वंचितांचा ते आवाज होऊ पाहतात. पण तो दाबून टाकण्याचे प्रयत्न होतात. स्वतंत्र आणि तटस्थ माध्यमांचे फेसबुक पेजेस ब्लॉक करता येतील, पण लोकांच्या मनातील असंतोष कुठलेही अकाऊंट रिपोर्ट करून ब्लॉक करता येऊ शकत नाही. तो जेवढा दडपण्याचा प्रयत्न होईल, तेवढ्याच तीव्रतेने तो उफाळून येत जाईल, हे असे फंडे वापरून गळचेपीचा प्रयत्न करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे, एवढेच आमचे सांगणे आहे.

लोकशाही जिंदाबाद!

जय संविधान!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा