खासदार ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा तरूण भाजपच्या आयटी सेलचा जिल्हाप्रमुख

0
365
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबादः कळंब तालुक्यातील नायगाव पडोळी येथे प्रचारादरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला करणारा तरूण भाजपच्या आयटी सेलचा जिल्हाप्रमुख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोर तरूणाचे नाव अजिंक्य टेकाळे आहे. निंबाळकर हे भाजपचा द्वेष करत असल्यामुळे आपण त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याची कबुली या तरूणाने पोलिसांना दिली आहे.

ओमराजे निंबाळकर बुधवारी सकाळी नायगाव पडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी गेले होते. निंबाळकर सभेच्या ठिकाणी जायला निघाल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी निंबाळकरांना गराडा घातला. त्याचवेळी हस्तांदोलन करताना अजिंक्य टेकाळे या तरूणाने निंबाळकरांवर चाकूहल्ला केला होता. चाकूचा वार निंबाळकरांच्या घड्याळावर बसल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. चाकूहल्ला झाल्यामुळे उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत अजिंक्य पळून गेला होता. मात्र शिवसैनिकांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे अजिंक्य एका घरात जाऊन लपून बसला. शिवसैनिकांनी त्या घराला गराडा घालून तो पळून जाणार नाही याची खबरदारी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अजिंक्यला अटक केली होती. निंबाळकरांनी भाजपविरोधी वक्तव्य केल्यामुळे आपण त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याची कबुली अजिंक्यने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे अजिंक्य टेकाळे हा भाजप जिल्हा आयटी सेलचा प्रमुख असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा