अहमदनगर: भाजपचा घोडा सध्या चौखूर उधळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घोड्याला लगाम घालण्यात अपयशी ठरल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच भाजपच्या या उधळलेल्या लगाम घालून वठणीवर आणेल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत तुम्ही प्रस्थापितांना सत्ता दिली, एकदा विस्थापितांना संधी द्या, असे आवाहन मतदारांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची प्रकाश आंबेडकरांनी खिल्ली उडवली. मोदी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे आता आकाशातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपला सत्ताच राबवता येत नाही. केवळ धर्माचा आधार घेत भाजप राज्य चालवत आहे. देशाचे अर्थकारण बिघडले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी अनेक बँका बुडविल्या आहेत. येत्या पाच वर्षात आणखी पाच बँका बुडणार आहेत, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेशी युती करून महात्मा गांधींच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप त्यांनी केला.