परळीत पंकजा मुंडेंची जागा धोक्यात, कर्जत- जामखेडमध्ये शिंदेंची दांडी गुल होण्याची शक्यता

0
2095
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच इंडिया टुडे- अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणाने धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री आणि भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची जागा धोक्यात असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. परळीत पंकजांची लढत त्यांचे भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याशी आहे. दुसरीकडे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात जलसंवर्धनमंत्री राम शिंदे यांचीही जागा धोक्यात असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्याशी शिंदे यांची लढत आहे.

अशोक चव्हाण,छगन भुजबळ, थोरात यांचा विजय सोपा

 इंडिया टुडे- अ‍ॅक्सिस माय इंडियाने राज्यातील व्हीआयपी मतदारसंघांचे सर्वेक्षण केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पुढे विजयासाठी फारसे आव्हान नसेल.परंतु कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

फडणवीस, महाजन, विखे,चंद्रकांत पाटलांसाठी सहज विजय

नागपूर नेऋत्य मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जामनेरमधून गिरीश महाजन, बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार, पाथर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील आणि कोथरूडमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विजय सोपा असेल, असा अंदाजही या सर्वेक्षणात बांधण्यात आला आहे. कोपरी- पाचपाखडीमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे गड राखण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारकाळात राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा निकाल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजला दे धक्का देणारा असेल, असा अंदाज या सर्वेक्षणाने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी ईव्हीएममधून नेमका काय निकाल बाहेर पडतो, याची उत्सुकता राज्याला लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा