पुन्हा महायुतीची सत्ता की काँग्रेस आघाडीचा महायुतीला दे धक्का? : उद्या फैसला

0
146
प्रतीकात्मक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी दिली. अनेक एक्झिट पोलने भाजप- शिवसेना महायुतीच्या बाजूने कौल दिलेला असला तरी मतदारांच्या मनात नेमके काय आहे, याचा अंतिम फैसला गुरूवारीच कळणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी 1999 ची पुनरावृत्ती करून महायुतीच्या तोंडचे पाणी पळवणार की महायुती पुन्हा सत्ता राखणार, याची उत्सुकता राज्याला लागली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची धाकधुकही वाढली आहे.

गुरूवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. 269 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मिळणार फेरी निहाय निकाल

भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

एक्झिट पोलचे अंदाज चुकणार :75 टक्के लोकांचे मत

एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील का? याबाबत लोकसत्ता ऑनलाइने ऑनलाइन ओपिनियन पोल घेतला. यात सहभागी झालेल्या 79 हजार 500 हून अधिक जणांपैकी 75 टक्के म्हणजेच जवळजवळ 59 हजार लोकांनी एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरु शकते असे मत व्यक्त केले आहे. तर 25 टक्के म्हणजेच 19 हजार जणांनी एक्झिट पोल खरे ठरतील, असे म्हटले आहे.

 महायुतीला नेमक्या किती जागा?, याचीच उत्सुकता

निकाल काही तासांवर येऊन ठेपल्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढत आहे. गुरूवारी राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान जागा टिकविणे आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणणे यासाठी भाजपने प्रयत्न केले त्यामुळे नेमक्या महायुतीला किती जागा मिळणार आणि महाआघाडी आपले अस्तित्व टिकवणार का?, हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे.

शेवटच्या काही दिवसांत चित्र पालटले

अगोदर एकतर्फी निवडणुकीचे चित्र वाटत होते तसे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहू शकले नाही. त्याला युती मधील बेबनाव आणि अन्यही अनेक कारणे आहेत. त्यातच शरद पवारांनी प्रचारादरम्यान त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल, अशी चिन्हे आहेत. अनेक एक्झिट पोलनी महायुतीच  पुन्हा सत्तेत येणार असे अंदाज बांधले असले तरी महायुती एक्झिट पोलमध्ये सांगितलेला आकडा गाठण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात राज्याचे एकूणच वातावरण फिरल्याचे चित्र होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा