हॅकिंगची भीती : परळीत मतपेट्यांचे स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

0
364
संग्रहित छायाचित्र.

परळी वैजनाथ :  परळी  विधानसभा मतदारसंघात मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा, तसेच 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरदरम्यान या परिसरातील मोबाइल टॉवर बंद ठेवा, अशी मागणी  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

देशात मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशीन हॅकिंगची जोरदार चर्चा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता कायम रहावी, या दृष्टीने निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात तातडीने जॅमर बसवण्यात यावेत. या दोन्ही ठिकाणांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री आणि भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावांत चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच ईव्हीएम मशीन हॅक केले जाण्याची भीती मुंडे यांनी व्यक्त केली आहे. आता निवडणूक आयोग मुंडे यांची मागणी विचारात घेऊन जॅमर बसवून मोबाइल टॉवर यंत्रणा बंद करते की नाही, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा