‘पुन्हा आणू या आपले सरकार’ लिहिलेले टी-शर्ट घालून शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात आत्महत्या

0
138
संग्रहित छायाचित्र.

बुलडाणा : राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची राळ उडालेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुलडाणा जिल्ह्यातील सभेपूर्वीच ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ हे भाजपचे घोषवाक्य आणि कमळाचे चिन्ह असलेले टी- शर्ट घालून एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  कामगार मंत्री डॉ. संजय कुटे हे जळगाव- जामोद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरवट बकाल आणि खामगाव येथे प्रचारसभा आयोजित केली होती. या सभेच्या काही तास आगोदरच बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील खातखेड येथील तरूण शेतकरी राजू ज्ञानदेव तलवारे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. रविवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. विशेष म्हणजे आत्महत्या केली तेव्हा या तरूण शेतकऱ्याने ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ हे भाजपचे घोषवाक्य आणि कमळाचे चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येप्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही बाजू मांडण्यात आली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा