एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि कदीर मौलाना यांच्यात हाणामारी

0
1665

औरंगाबाद : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या कटकट गेट भागातील मतदान केंद्राजवळ हाणामरी झाली. या हाणामारीनंतर या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या हाणामारीत इम्तियाज जलील यांचे कपडेही फाटले.

मतदान संपता संपता कटकट गेट भागात मतदानाच्या वादातून इम्तियाज जलील आणि कदीर मौलाना यांच्यात आधी वादावादी झाली. त्या वादावादीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. या प्रकारानंतर कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी एमआयएमचे शेकडो कार्यकर्ते इकरा उर्दू शाळेजवळ ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी समजावूनही कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी या भागात प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, आपणाला कोणतीही मारहाण झालेली नसून मी सुखरूप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एमआयएमचे मतदान कापण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना मजलिसच्या स्टाइलने उत्तर दिले, असे खासदार इम्तियाज जलील यांनी फेसबुकवर पोस्ट करून म्हटले आहे.  औरंगाबादचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनीही कोणालाही मारहाण झालेली नसून केवळ बाचाबाची झाली आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे म्हटले आहे.

इम्तियाज जलील आणि कदीर मौलाना यांच्यात आधी बाचाबाची झाली.
कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा