सरकारच्या उदासीनतेमुळे 5 वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या : मनमोहन सिंग

0
113
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई आणि महाराष्ट्रच सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य आले आहे. परिणामी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत, असा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूवारी केला.देशातील प्रत्येक समस्येसाठी विरोधकांना दोष देणे एवढा एकच उद्योग सरकार करत आहे, असे डॉ. सिंग म्हणाले.

 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ. मनमोहन सिंग महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी पंजाब- महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) खातेदारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना कायम मदत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. मात्र विद्यमान सरकारची उदासीनता आणि आर्थिक मंदीमुळे देशाचे भवितव्यच अंधारात गेले आहे. दरवाढ नियंत्रण राखण्याच्या मोदी सरकारच्या हट्टाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आयात- निर्यात धोरणालाही याच हट्टाची झळ बसली आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. शेतकरी आत्महत्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे डॉ. सिंग म्हणाले.

देशातील व महाराष्ट्रातील आर्थिक संकटावर उपाय शोधण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशाचे ऑटो हब असलेल्या पुण्यावरही मंदीचे मळभ दाटले आहे. 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर एवढी करण्यासाठी आर्थिक विकासदर 10 ते 12 टक्के असायला हवा, याचा पुनरुच्चारही डॉ. मनमोहन सिंग यांनी केला.  जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 अस्थायी आहे, असेच आम्ही समजत होतो. हे कलम जम्मू- काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठी हटवले गेले पाहिजे होते. मात्र ज्यापद्धतीने हे कलम हटवण्यात आले, त्याला आमचा विरोध होता, असेही डॉ. मनमोहन सिंग म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा