बीड : मतदानाला काही तासच उरले असताना परळी विधानसभा मतदारसंघातील बहीण-भावातील लढाई वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत त्यांचे भाऊ आणिराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्यानंतर त्याच त्रासातून पंकजा मुंडे यांना भरप्रचारसभेत भोवळ आल्याचा आरोप करत धनंजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही व्हिडीओ क्लिप एडिट करण्यात आलेली असून अशी क्लिप व्हायरल करणाऱ्यांनी किमान बहीण-भावाच्या नात्याच्या पवित्र्याचे तरी भान ठेवावे, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी विडा येथील प्रचारसभेत पंकजा मुंडे यांच्यावर बिभत्स भाषेत टीका केल्याचा आरोप असून त्यांच्या या भाषणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. त्यानंतर परळीतील समारोपाच्या सभेत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर कडाडून टीका केल्यानंतर त्यांना भोवळ आली. या सर्व घडामोडींनंतर शनिवारी रात्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून खुलासा केला आहे. ‘शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू . काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित, असे धनंजय मुंडे यांनी या खुलाशात म्हटले आहे. या वादावर गरमागरम राजकीय चर्चाही झडू लागल्या आहेत.

या वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचा आयटी सेल बहीण-भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करत आहे, परभवाची जाणीव झाल्यानेच हा सगळा आटापिटा सुरू आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. या तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर परळीतील निवडणूक खालच्या पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न होताना दिसू लागला असून त्याचे निकालावर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
