शरद पवारांच्या मुसळधार पावसातील एका सभेने धुऊन टाकल्या मोदींच्या ९,शहांच्या २० प्रचारसभा

पवारांच्या साताऱ्यातील एका सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ आणि भाजप अध्यक्ष अमित शहांच्या वीस सभा धुवून टाकल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.

0
1907
साताऱ्यातील प्रचारसभेत मुसळधार पावसात भाषण करतानाच शरद पवारांचा हाच फोटो मास्टरस्ट्रोक ठरला.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेली सभा राज्यभर चर्चेचा विषय तर ठरलीच शिवाय पवारांनी मारलेल्या या मास्टरस्ट्रोकमुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवार हिरवेगार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यभरातील तरूणाई शरद पवार नावाच्या ऐंशी वर्षे वयाच्या ‘तरूणा’वर फिदा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे 24 तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवारांनी निवडणुकीचे मैदान गाजवले आणि जिंकल्याचे चित्र आहे. या एकूणच परिस्थितीवर पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी वारं फिरलंय, इतिहास घडणार, असे सूचक ट्विट केले आहे.पवारांच्या साताऱ्यातील एका सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ आणि भाजप अध्यक्ष अमित शहांच्या वीस सभा धुवून टाकल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.

 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून शरद पवार पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. या निवडणुकीतील त्यांची प्रत्येकच सभा लक्षवेधी ठरली. मात्र सातार्‍यातील सभा शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक ठरली आहे. मुसळधार पावसात पवारांनी घेतलेल्या या सभेने केवळ सातारा जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचाच माहोल बदलून टाकला आहे. पवारांच्या मुसळधार भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वयोवृद्ध आणि पायाच्या जखमेने त्रस्त तरूणाची जिद्द, चिकाटी आणि लढवय्यावृत्तीवर राज्यभरातील तरूणाई फिदा झाली आहे. अनेकांच्या व्हॉट्सअप डीपीमध्ये पवारांचा मुसळधार पावसात भाषण करतानाचे फोटो आणि या सभेचीच चर्चा करणारे स्टेट्स झळकू लागले आहेत. फेसबुक, ट्विटरवरही साताऱ्यातील मुसळधार सभेप्रमाणेच पवारांवरच मुसळधार चर्चा सुरू आहे. बाबांची ही चिकाटी सुप्रिया सुळेंनीही सूचक ट्विट केले आहे.‘ साताऱ्याच्या मातीने आज पुन्हा इतिहास घडवला. तुफान पावसातही माणसांनी तुडुंब भरलेले मैदान आदरणीय साहेबांना ऐकत होते. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’ हा संदेश देणारी ही सभा होती. या सभेने सर्वांनाच नवीन ऊर्जा मिळाली’, असे सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पवारांच्या सभेने फिरलेले हे वारं 21 तारखेला कोणता इतिहास घडवणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा