तुम्हाला राज्य चालवायला दिले की स्वयंपाक करण्यासाठी?: शिवसेनेच्या दहा रुपयांत थाळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा टोला

0
123
संग्रहित छायाचित्र.

सोलापूरः पुन्हा सत्तेत आलो तर राज्यात दहा रुपयांत सकस जेवणाची थाळी देऊ, असे आश्वासन शिवसेनेच्या वचननाम्यात देण्यात आले आहे. या आश्वासनाची  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्हा राज्य चालवायला दिले की स्वयंपाक करण्यासाठी? असा टोला शरद पवारांनी शिवसेनेला लगावला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आयोजित प्रचारसभेत शरद पवार म्हणाले की,  राज्यात युतीचे सरकार असताना शिवसेनेने 1 रुपयांत झुणका-भाकर योजना सुरू केली. त्याचे काय झाले? झुणका- भाकर योजना कधी बंद पडली, हे कळलेसुद्धा नाही. तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर अन्य उद्योगधंदे सुरू आहेत, असे शरद पवार म्हणाले.

सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु समुद्रात स्मारकाची एकही वीट उभारली नाही. उलट छत्रपतींच्या काळात ज्या किल्ल्यांवर भवानी तलवार तळपली, त्या किल्ल्यांवर शिवसेना- भाजपच्या काळात छमछम बघावी लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत, असेही पवार म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत कलम 370 च्या मुद्यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. कलम 370 ला विरोध करणार्‍या पक्षांना मतदान करणार का, असा सवाल प्रत्येक सभांमधून अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. त्यावरही शरद पवारांनी भाजप- शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. कलम 370 रद्द करण्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र त्याचा विनाकारण जप सुरू आहे, असे सांगत 370 कलमावर ओरडणारे कलम 371 वर गप्प का?, असा सवाल शरद पवारांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा