मुंबईः अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या धोरणावर शनिवारी शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार, असे भाजपकडून आधी लिहून घ्या आणि मगच पुढील निर्णय घ्या, अशी आक्रमक मागणी शिवसेनेच्या आमदारांनी शनिवारी मातोश्रीवर झालेल्या तातडीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर घेतली. आमदरांचा आक्रमकपणा पाहून उद्धव ठाकरेही आक्रमक झालेले दिसले. ठरल्याप्रमाणे भाजप वागली नाही तर अन्य पर्याय खुले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना सांगितले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड करणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
सत्तेतील समान वाटा मिळावा, या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदारही आक्रमक झाल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत जवळपास तासभर खल झाल्यानंतर शिवसेना नेते प्रताप नाईक यांनी या बैठकीबद्दल माहिती दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सत्तेत फिफ्टी- फिफ्टी वाट्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी तसे लेखी पत्र भाजपकडून घ्यावे आणि नंतरच पुढील पावले टाकावी, असे या बैठकीत ठरल्याचे नाईक म्हणाले. या बैठकीत सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना बहाल करण्यात आले आहेत. अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा मिळाल्याशिवाय पुढील चर्चा नको, अशी भूमिकाच शिवसेनेने घेतल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापनेची प्रक्रियाही लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत.10 अपक्षांचा पाठिंबाही भाजपकडेच आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली तर ती मागणी भाजप कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही, असे भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि ती मान्य करण्यास भाजपकडून मिळत असलेला नकार पाहाता भविष्यात राज्यात काय घडेल आणि सत्तेचे राजकारण कोणते वळण घेईल, याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.