शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यात चाकूहल्ला, तरूणाला अटक

0
143
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबाद : शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब तालुक्यातील नायगाव येथे एका तरूणाने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात निंबाळकर यांना कोणतीही इजा झाली नाही. हल्ला करून पळून चाललेल्या हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या हल्ल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर हे कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ नायगावात पायी चालत जात असताना हा प्रकार घडला. पदयात्रा सुरू असताना गर्दीतून आलेल्या एका तरूणाने आधी ओमराजे निंबाळकर यांच्याशी हात मिळवला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या पोटावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. ओमराजे निंबाळकर यांच्या घड्याळावर चाकूचा वार बसला. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर हल्लेखोर तरूण पळून गेला.  घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर तरूणाला अटक केली आहे.

हल्लेखोर तरूण कोण होता, हे माहीत नाही. त्याने हल्ला का केला हेही माहीत नाही. माझ्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झाली आहे. या हल्ल्यामुळे मलाही धक्का बसला आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी या हल्ल्यानंतर सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा