चंद्राच्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?: राहुल गांधींचा सवाल

0
59
औसा येथी प्रचारसभेत राहुल गांधी.

मुंबई: गेल्या चाळीस वर्षांत नव्हती तेवढी बरोजगारी आज देशात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. अनेकांच्या आहेत त्याच नोकर्‍या जात आहेत. बँकांचे घोटाळे समोर येत आहेत. असे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्राविषयी बोलत आहेत. चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का आहेत? असा सवाल काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस नेते नसीम खान यांच्या प्रचारार्थ चांदीवली येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना खूप आश्वासने दिली होती. परंतु आज सर्वसामान्य जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मोदी सरकारने गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेचे कंबरडे मोडले. काळा पैसा नष्ट करायचा असल्याचे सांगून मोदींनी नोटबंदी केली. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते.पण ज्यांच्याकडे काळा पैसा होता, ते थेट देशाबाहेर पळून गेले. आज लहान उद्योग बंद होत आहेत. मोठे उद्योग संकटात आहेत. याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत, असे राहुल म्हणाले.

मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. त्यावरही भाष्य करत नाहीत. लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. देशातल्या युवा पिढीला भविष्य दिसत नाही. मोदी परदेशात फिरण्यात व्यस्त आहेत, असे राहुल म्हणाले.

पंतप्रधान म्हणतात देशाने 70 वर्षांत काही केले नाही. काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जे केले त्याची पंतप्रधान थट्टा करत होते. भारताची शक्ती भारताची अर्थव्यवस्था होती. भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करू शकत होती. आता सत्य तुमच्यासमोर आहे. नोटबंदी, जीएसटीने भारताच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचाच नाही. सरकार खरे बोलत नाही. आधी जगात देशाला मान होता. मात्र आज देशात गुंतवणूक येत नाही. उद्योगपती देश सोडून जात आहेत. भाजप देशाला विभागण्याचे काम करत आहे, असेही राहुल म्हणाले.

 तत्पूर्वी लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत राहुल यांनी मूलभूत प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप काश्मीर, कलम 370 चा मुद्दा उचलून धरत आहेत, असा आरोप केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा