महाराष्ट्राच्या राजकारणाचे व्याकरण बदलणार की जुन्याच वेलांट्या कायम रहाणार?

0
121
प्रतीकात्मक छायाचित्र.

कौशल दीपांकर/ मुंबई

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अनेक अर्थाने महत्वाचे आहेत. महाराष्ट्रातील जनता सत्तेचा उन्माद सहन करत नाही, हे या निकालांनी दाखवून तर दिलेच, शिवाय लोकांना गृहित धरून सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी करणारांनाही जनता योग्यवेळी धडा शिकवून जमिनीवर आणते, हेही या निकालांनी दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता आणि आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर कुणी विरोधकच दिसत नाहीत, अशी अहंगंडाची भाषा मुख्यमंत्री वापरत होते, या दोन्हीतून भाजपने महाराष्ट्राला गृहित धरल्याचेच स्पष्ट होत होते. हे गृहित धरणे आणि शरद पवारांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याचे राजकारण संपवून टाकण्याची खुनशी भाषा करणे महाराष्ट्राला आवडलेले नाही, हेच हे निकाल सांगून जातात. या सर्व पार्श्वभूमीवर मिळालेला जनादेश लक्षात घेता महाराष्ट्राच्या राजकारणाचे व्याकरण बदलणार की जुन्याच वेलांट्या कायम रहाणार, हे पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सूक आहे.

निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवीन समीकरण जुळले तर त्याला माझा पाठिंबाच असेल असे सूतोवाच करून नव्या चर्चेला तोंड फोडून दिले. त्यानंतर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधून असल्याचे जाहीर करून टाकले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भाषा बदलली आणि ती आक्रमक झाली. आधी सत्तेत समान वाटा निश्चित करा, मगच सत्ता स्थापनेचा दावा करू, अशी स्पष्ट भूमिकाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकली. त्यामुळे सर्वांचीच पावले नव्या समीकरणाच्या जुळवाजुळवीच्या दिशेने पडू लागली असल्याचा अर्थ काढला जाऊ लागला आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशभर भाजप राजकीय भस्मासूर बनला आहे. या भस्मासूराची भूक वाढतच चालली आहे. त्या भूकेपोटी तो एकेका राजकीय पक्षाचे अस्तित्वच गिळंकृत करत चालला आहे, ही सार्वत्रिक भावना पहायला मिळते. गेली पाच वर्षे सत्तेत सोबत असूनही भाजपने शिवसेनेचे जे हाल केले, ते पहाता, त्याचे उट्टे काढण्याची आयती चालून आलेली संधी शिवसेना हातची जाऊ देणार नाही, असे काही जणांना वाटते. म्हणूनच नव्या समीकरणाचा पायरोव होण्याची शक्यता जास्त दिसू लागली आहे.

काय असतील पर्याय?

पर्याय 1 : शिवसेना म्हणते त्याप्रमाणे सत्तेत समान वाटा देण्याच्या सूत्रावर भाजप तयार झाली तर अडिच- अडिच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ दोघेही वाटून घेतील. समान वाट्यात शिवसेनेकडून महत्वाच्या खात्यांची मागणीही केली जाईल. अडिच- अडिच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वाटून घेण्यावर भाजप राजी झाली तरी, पहिला कार्यकाळ स्वतःकडे ठेवून घेईल. तसे झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वेलांट्या कायम रहातील.

धोका काय?: एकदा शपथविधी झाला आणि सरकार स्थापन झाले की अडिच वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता मात्र कमीच आहे. 2009 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेतील अशाच सत्तावाटपाचे सूत्र हे ताजे उदाहरण आहे. अडिच-अडिच वर्षे महापौरपदाचे सूत्र ठरूनही भाजपच्या विजया रहाटकर यांनी अडिच वर्षांनंतर राजीनामा न देता संपूर्ण पाच वर्षे महापौरपद उपभोगले आणि शिवसेनेची फरपट झाली होती. असाच काहीसा प्रकार मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीतही होण्याचा धोका आहे.

पर्याय 2. भाजपने गेली पाच वर्षे दिलेली वागणूक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा प्रभाव करून स्वतःचा प्रभाव वाढवण्याच्या भाजपच्या रणनीतीला लगाम घालण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापनेचा विचार करू शकते. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, हे खर करून दाखवायची ही संधी शिवसेनेकडे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच या प्रस्तावासाठी दारे खुली ठेवली आहेत. हे समीकरण जुळले तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात. हे समीकरण जुळले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे व्याकरणच बदलेले पहायला मिळू शकते.

पर्याय 3 : शिवसेनेने भाजपला आपल्या कह्यात ठेवण्यासाठी खूपच मागण्या केल्या तर भाजप अपक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी करू शकते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकार स्थापनेसाठी स्वतःहोऊन पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी मात्र पवारांनी कोणतीही उघड खेळी खेळली नसली तरी त्यांच्या मनात काय आहे, हे लवकरच कळेल. भाजपने पवारांवरच ईडीच अस्त्र उगारले होते, त्यामुळे पवार भाजपला पाठिंबा द्यायला तयार होणार नाहीत, असेच संकेत आहेत. उलट नातू रोहित पवारांच्या माध्यमातून शरद पवारांनीच शिवसेनेच्या सत्तेच्या नव्या समीकरणाचा पत्ता फेकल्याचेही काही राजकीय जाणकार सांगतात.

या एकूणच पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेना जो निर्णय घेईल, त्यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची भावी दिशा ठरलेली असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा