महाराष्ट्राचा कौल कुणाला? : कलम 370, तीन तलाकच्या बाजूने की शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या विरोधात?

0
102
संग्रहित छायाचित्र.

कौशल दीपांकर/ मुंबई

विधानसभेचे मतदान आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रविवारी सभा झाल्या. मोदींनी त्यांच्या भाषणात अपेक्षेप्रमाणे कलम 370, तीन तलाक आणि राष्ट्रभक्तीसारख्या भावनिक मुद्यांवरच जोर दिला. तर राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी असे मूलभूत प्रश्न लावून धरले. आता महाराष्ट्र मोदींच्या भावनिक मुद्यांच्या बाजूने कौल देणार की मूलभूत प्रश्नांची बूज राखणार हे 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानातूनच स्पष्ट होईल.

महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये मोदी कलम 370, तीन तलाक, राष्ट्रभक्तीचे भावनिक मुद्दे लावून धरत शरद पवारांना लक्ष्य करतील, असे आधीच ग्रहित धरण्यात येत होते. घडलेही तसेच. पवारांवर टीका करत आणि हे भावनिक मुद्दे लावून धरत मोदींनी महाराष्ट्राला महाजनादेश मागितला. महाराष्ट्रात मोदींच्या एकूण नऊ सभा होणार आहेत. त्या सर्वच सभांमध्ये मोदी हेच मुद्दे लावून धरतील आणि मते मागतील, असे सध्याचे चित्र आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी  बेरोजगारी गेली का? रोजगार मिळाला का? अच्छे दिन आले का?  असे सवाल उभे केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने बसवलेली देशाची आर्थिक घडी मोदींनी विस्कटवून टाकली, मोदींच्या धोरणांमुळे आलेल्या आर्थिक मंदीने दोन हजार कंपन्या बंद पडल्या, असा आरोप करत चंद्राच्या गप्पा मारणारे मोदी शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीवर का बोलत नाहीत? असा सवालही केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मनसे प्रमुख राज ठाकरे हेही राहुल गांधींप्रमाणेच महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न उपस्थित करत आहेत. सत्ताधाऱ्यांना सवाल करत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी तर टीका सोडून सकारात्मक विकासाच्या मुद्यावर आपला प्रचार केंद्रित केला आहे. दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांनी मोदींनी मांडलेले भावनिक मुद्देच आधीपासून लावून धरलेले आहेत. भाजपला भावनिक मुद्यांवर तर विरोधकांना मूलभूत प्रश्नांवर मते हवी आहेत, असेच एकूण चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच भावी राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्राने अनेकदा देशाच्या राजकारणाची दिशा ठरवली आहे. बदलली आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने सर्जिकल स्ट्राइक, राष्ट्रभक्ती अशा भावनिक मुद्यांवरच कौल दिलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील मतदार भावनिक मुद्यांच्या बाजूनेच वहात जातात की राज्याच्या मूलभूत प्रश्नांवर वेगळा विचार करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा