भाजपचे संकल्पपत्र : इंदू मील येथील आंबेडकर स्मारकासाठी 2020ची डेडलाइन, मात्र अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी डेडलाइनच नाही

0
82

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर येऊन ठेपले असताना भाजपने मंगळवारी आपले संकल्पपत्र प्रकाशित केले. या संकल्पपत्रात 2020 पर्यंत इंदू मील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. या संकल्पपत्रात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ते कधी पूर्ण करणार याची कोणतीही डेडलाइन देण्यात आलेली नाही.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले. देशाचीच अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून जागतिक किर्तीच्या अनेक अर्थतज्ज्ञांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केलेली असतानाच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर करण्याचे आश्वासन या संकल्पपत्रात देण्यात आले आहे. ‘शिवरायांचा विचार हाच आमचा आचार, पुन्हा आणू या आपले सरकार’ असे घोषवाक्य या संकल्पपत्रात आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे.

अन्य काही आश्वासने अशी :

  • पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार.
  • मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागात आयआयटी, आयआयएम व एम्स या केंद्र सरकारच्या संस्था उभारणार.
  • प्राथमिक शिक्षणापासूनच क्रीडा अभ्यासक्रम सुरू करणार. औरंगाबाद येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आणि प्रत्येक विभागात एक क्रीडा अकादमी स्थापन करणार.
  • पुढच्या दोन वर्षांत महाराष्ट्र मोती बिंदूमुक्त करणार. राज्यात 15000 अद्ययावत आरोग्य केंद्रे उपलब्ध करून देणार.
  • महिलांना आर्थिक विकासात 50 टक्के भागीदारी. महिलांच्या आरोग्यासाठी एक रुपयात सॅनेटरी नॅपकीन. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतिगृह उभारणार.
  • 2022 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडणार.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा