महाराष्ट्र विधानसभा 2019 : एक्झिट पोलचा कौल महायुतीला, पण राज्यभर चर्चा उलथापालथीचीच!

0
924
प्रतिकात्मक छायाचित्र.

कौशल दीपांकर / मुंबई

 महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप- शिवसेना महायुतीला पुन्हा कौल देण्यात आला असला तरी मतदारांत उलथापालथीच्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. जाहीर करण्यात आलेले एक्झिट पोलचे अंदाज मतदारांचा ‘माइंड सेट’ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगत ईव्हीएमवरही संशय घेण्यात येऊ लागले आहेत.

भाजप आणि शिवसेना युती असली तरी शिवसेनेच्या 83 अधिकृत उमेदवारांविरुद्ध भाजपने तर भाजपच्या 69 अधिकृत उमेदवारांविरुद्ध शिवसेनेने बंडखोरी करून आव्हान दिले आहे, या मुद्याकडे एक्झिट पोलमध्ये दुर्लक्ष करण्यात आल्याची टीकाही होऊ लागली आहे. एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात जमीन- अस्मानचे अंतर असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जाऊ लागले असून निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घेण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजावर शंका घेत कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार किती मताधिक्याने बाजी मारणार याबाबतचे अंदाजही नेटकरी आपापल्या परीने बांधू लागले आहेत. त्यात बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

मतदारसंघातील प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर दिसणारे एक्झिटपोलचे अंदाज पाहून काही नेटकऱ्यांनी धक्का बसल्याचे सांगत या आकडेवारीच शंका घेतली आहे. जगभरात कुठेही एक्झिट पोल तंतोतंत ठरत नाहीत. भारतात वृत्तवाहिन्या आणि निवडणूक आयोगाची गट्टी असल्याचा आरोपही काही नेटकरी करू लागले आहेत.

काही जणांकडून तर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर ही महाराष्ट्रातील शेवटची निवडणूक असेल. या नंतर कोणीही निवडणूक लढवणार नाही आणि कुणीही मतदान करणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.

एक्झिट पोलच्या खरेपणाबद्दल नेहमीच शंका :मतदान संपल्यानंतर जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या खरेपणाबद्दल नेहमीच शंका घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज सपशेल खोटे ठरले होते. त्यामुळे एक्झिट पोलची आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र वेगळे असू शकते, यावर काहीजण ठाम आहेत.

नेते काय म्हणतात?

भाजपला मराठा समाजाचे जे मतदान होत होते, तेच मतदान काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला जो प्रतिसाद होता, तो आता दिसला नाही. भाजप- शिवसेनेत सख्य नाही. त्याचाच फायदा आम्हाला होणार.

  • प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख

नवीन पिढी राजकीय परिवर्तनास अनुकूल असून राज्यात नक्की सत्ता परिवर्तन होईल.शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढत्या आत्महत्या हे प्रश्न आहेत. 50 टक्के कारखानदारी बंद पडली आहे. कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे मुद्दे जनतेत अस्वस्थता निर्माण करणारे होते. यामुळे राज्यात परिवर्तन होईल.

  • शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा