भाजपमध्ये जाताच छत्रपतींचे वंशज बदलले : उदयनराजे म्हणाले, गडकिल्ले लग्न समारंभाला भाड्याने द्या; देशाची अर्थव्यवस्था सुधारेल !

0
99
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार तळपवून जिंकलेले महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयावर उठलेली टिकेची झोड शांत होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचे चांगलेच मतपरिवर्तन झाले आहे. ऐतिहासिक गडकिल्ले लग्न समारंभांसाठी भाड्याने दिले तर देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असे अजब तर्कट उदयनराजेंनी मांडले आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजानेच ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या मागणीऐवजी ते भाड्याने देण्याच्या धोरणाचे समर्थन केल्यामुळे संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. भाजपच्या सुरासूर मिसळल्याशिवाय आपणाला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकता येणार नाही, अशी भीती असल्यामुळेच उदयनराजेंनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

राज्यातील गडकिल्ले भाड्याने देण्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणाला मीडियाने चुकीचे वळण दिले आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली आहे. त्यांनी मला सरकारचे धोरण समजावून सांगितले आहे. किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभासाठी भाड्याने द्यावा, असे या धोरणात म्हटले आहे. मला यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिले तर देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असे सांगतानाच आपण देवळात लग्न लावत नाही?, असा सवालही उदयनराजेंनी केला आहे.

 हेरिजेट पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील 25 ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्न समारंभांसाठी भाड्याने देण्याची योजना आखली आहे. 50 ते 60 वर्षांच्या भाडेतत्वावर हे किल्ले भाड्याने देण्याची फडणवीस सरकारची योजना उजागर झाल्यानंतर राज्यभरातून या धोरणावर टिकेची झोड उठली होती. त्यानंतर कोणतेही किल्ले भाड्याने दिले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते. मात्र आता छत्रपतींच्या वंशजांनीच सरकारच्या धोरणाचे समर्थन केल्यामुळे गडकिल्ले भाड्याने देण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा