कुंडल्या पाहणारे आता पुस्तके वाचू लागलेः मुख्यमंत्री ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
208
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मागच्या पाच वर्षांत अनेकांच्या कुंडल्या पाहणारे गेल्या वर्षभरापासून सरकार कधी पडणार याचे मुहूर्त काढायला लागले आहेत. पण कुंडल्या फक्त वाचता येतात त्या बदलता येत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचा आधार घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. विरोधकांच्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोरोनावरून विरोधक आमच्यावर टीका करत होते. पण कोरोनाचा प्रसार निश्चितच कमी होतोय.  आमच्या धारावी मॉडेलचे जगभर कौतुक झाले आहे, हे मात्र विरोधकांना दिसले नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून आकडेवारी लवपून ठेवलेली नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. व्हॅक्सीनसंदर्भात पंतप्रधान मोदींनी व्हिडिओकॉन्फरन्सिंग घेतली. पण त्यात व्हॅक्सीन कधी देणार, कसे देणार याबद्दल अवाक्षरही सांगण्यात आले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या तरी मास्क वापरणे, अंतर राखणे हे उपाय आपल्या हातात आहेत, असेही ते म्हणाले.

विकृत राजकारणाला थारा नाहीः जो आपल्याला आवडता असतो त्याच्याविरोधात हक्कभंग टाकणाऱ्या आमदार प्रताप सरनाईकांच्या विरोधात ईडीची चौकशी लावली जाते. हे विकृत राजकारण आहे. कोणीही उठावे आणि टपली मारावी हे आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. आम्ही असले विकृत राजकारण करत नाही आणि अशा राजकारणाला थाराही देणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

मराठा आरक्षणाची लढाई जिंकणारचः मराठा आरक्षणाची लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. पण दरम्यानच्या काळात कोणाच्या तरी सडक्या मेंदूतून अफवा निघाली की ओबीसींच्या आरक्षणाला यातून धक्का लागणार आहे. पण मी मुख्यमंत्री म्हणून ग्वाही देतो की, मराठा समाजाच्या हक्काचे देत असताना ओबीसी समाजाच्या हक्काचे कणभरही काढून घेण्यात येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समाजात जर कोणी अशा प्रकारे आग लावायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्यावर आम्ही पाणी टाकूच. पण राज्यातील जनताही त्याच्यावर पाणी टाकल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

फडणवीस दिल्लीत जावे ही मुनगंटीवारांची इच्छाः विरोधी पक्षनेते मोठा विचार करतात. ते दिल्लीला जावेत अशी अनेकांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवारांची पण तिच इच्छा आहे, असा टोलाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी लगावला. त्यावर आमच्या मित्राच्या मागे का लागता, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही येथेच थांबा, तुम्ही कुठेही जाऊ नका… तेव्हा सभागृहात हशा पिकला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा