मुंबईः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी शिक्षण विभागातील शिपायांसह चतुर्थ श्रेणीची पदे रद्द केल्याच्या निषेधार्थ विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने राज्यातील खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिपायांसह चतुर्थ श्रेणीची पदे नुकतीच रद्द केली आहेत. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून या निर्णयाला राष्ट्रवादीच्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचाः राज्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिपायाची पदे रद्द, ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शिपायांच्या ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक पदवीधर आमदारांनी या निर्णयाच्या निषेधार्थ आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निदर्शने केली.