विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक, भाजपच्या आव्हानामुळे सरकारची दुसरी परीक्षा

0
110

मुंबईः विधानसभा अध्यक्षपदासाठी आज सकाळी 11 वाजता निवडणूक होत असून शनिवारी विश्वासदर्शक ठराव स्पष्ट बहुमताने जिंकलेल्या ठाकरे सरकारसाठी ही दुसरी परीक्षा ठरणार आहे. या निवडणुकीसाठी नियमाप्रमाणे गुप्त मतदान घ्यावे लागते. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीकडून याही निवडणुकीसाठी खुल्या पद्धतीने मतदान घेण्याची मागणी होऊ शकते. महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नाना पटोले हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपने किसन कथोरे यांना मैदानात उतरवले आहे.

आज सकाळी 11 वाजता विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच खुल्या पद्धतीने मतदान घेण्याचा ठराव सत्ताधारी पक्षाकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी साडेतीन दिवसाच्या फडणवीस सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला दिला जाऊ शकतो. आमदारांचा घोडेबाजार रोखण्यासाठी विधानसभेतील वातावरण निष्पक्ष राखले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. आमदार फाटाफुटीचा धोका उद्भवू नये म्हणून सत्ताधारी पक्षाकडून ही रणनिती आखली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी खुल्या मतदानाच्या ठरावाला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला तर बहुमताच्या आधारे ही निवडणूक खुल्या मतदानाने पार पडू शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा