मला निवडणुकीत पाडून दाखवाचः अजित पवारांचे मुनगंटीवारांना खुले आव्हान

0
74
संग्रहित छायाचित्र.

मुंबई हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी विरोधकांनी सरकारवर आरोप-प्रत्यारोप, टिका-टिपण्णी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशावेळी अजित पवार व सुधीर मुनगंटीवार या आजी-माजी अर्थमंत्र्यांमध्ये विधानसभागृहात जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचे चित्र दिसले. सभागृह हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तर तो पुन्हा कधी निवडून येत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवार यांचे उपरोधिक बोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गंभीरपणे घेतले. तुमचे आव्हान मी स्वीकारतो. तुम्ही मला पाडून दाखवा, असे थेट आव्हान पवार यांनी दिले.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मुद्यावरुन ठाकरे सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे आरोप मुनगंटीवार करत होते. त्यावेळी अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही’ असा टोला मुनगंटीवार यांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असे टिप्पणी करत मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केला.

र्चेवेळी मुनगंटीवार म्हणाले, ऑक्सफर्ड विद्यापीठाने सीरमसोबत कोरोना लसीसाठी काम सुरु केल्याचे ऐकल्यानंतर मी इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करत होतो. तेव्हा एक वेबसाईट माझ्यासमोर खुली झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात रसेल फॉस्टर नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे, की तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. म्हणजेच महिन्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. माझा, तुमचा (अजित पवार), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म महिना जुलै आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा