हेमंत करकरेंचा मृत्यू अजमल कसाबच्या नव्हे, तर पोलिसाच्या गोळीमुळे झालाः न्या.कोळसे पाटील

0
436
संग्रहित छायाचित्र.

नागपूरः  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबच्या नव्हे तर मुंबई पोलिसाच्या गोळीमुळे झाला, असा खळबळजनक आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या लेट मी से नाऊ या पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटांमुळे निर्माण झालेले वाद शांत होत नाहीत, तोच कोळसे पाटील यांच्या या आरोपामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

 न्या. कोळसे पाटील हे अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी आणि एनपीआर संघटनेचे अध्यक्ष आहेत. नागपुरातील एका सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या महाराष्ट्र पोलिसांनीच केल्याचा आरोप केला आहे. करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांकडून वापरण्यात येणारी पिस्टल ‘पॉइंट नाइन’ मधून झाडल्या गेलेल्या गोळीने झाला होता. हे कृत्य महाराष्ट्र पोलिसांतील हिंदू विचारसरणीच्या पोलिसांनी केले, असे कोळसे पाटील म्हणाले.

 करकरे यांच्या मृत्यूबद्दल शंका घेतली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2009 मध्ये ज्येष्ठ वकील फिरोज अन्सारी यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूमागे षडयंत्र असल्याची शंका घेत जेव्हा कामा हॉस्पिटलजवळ पोलिस दल तैनात होते, तर त्यांना दहशदवादविरोधी कारवाई दरम्यान का बोलावण्यात आले नाही? त्यांना फोन करणारा पोलिसवाला कोण होता? करकरेंना किती गोळ्या लागल्या होत्या? गोळ्या किती दूरून मारण्यात आल्या होत्या? आणि गोळ्या कोणत्या शस्त्रातून लागल्या होत्या?, असे प्रश्‍न आरटीआयअंतर्गत मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांना विचारले होते. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणारे करकरे यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असताना त्यांना विशेष सुरक्षा का देण्यात आली नव्हती आणि हल्ल्याच्या वेळी ते बुलेटप्रुफ गाडीतून जात होते का? जेव्हा करकरे कामा हॉस्पिटलपासून रवाना झाले होते, तेव्हा त्यांच्याकडे कोणते शस्त्र होते? त्यांनी अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या होत्या का? असे सवालही अन्सारी यांनी केले होते. आता कोळसे पाटील यांनी नव्याने आरोप केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा