मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर विविध मराठा संघटनांनी उद्या १० ऑक्टोबर रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा सकल मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. राज्य सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्यामुळे बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत गुरूवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीला मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती होती. रात्री उशिरा आमची बैठक झाली. सरकारने आमच्या अनेक मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, असे पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात मराठा समाजाची गोलमेज परिषद झाली होती. या परिषदेत १० ऑक्टोबरच्या बंदची हाक देण्यात आली होती.