पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी, रामदेव बाबांना झटका

0
140
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोना संसर्गावर तयार केलेल्या कोरोनील औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसारच आयुष मंत्रालयाने कोरोनीलला मान्यता दिल्याचा बाबा रामदेव यांचा दावा खोटा असून सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणिकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळून लावला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याला समर्थन देणे योग्य नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणिकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

पतंजलीचे कोरोनील हे औषध प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतेच हे औषध बाजारात दाखल करण्यात आले आहे. सुरूवातील हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचे सांगण्यात येत होते. आता ते कोरोनावर मात करणारे औषध असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात दाखल करण्यात आल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीच उघडपणे देशवासियांची दिशाभूल केल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. या कथित औषधाला कोणत्या निकषांच्या आधारे मान्यता देण्यात आली, त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणीही आयएमएने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा