चंद्रकांत पाटलांना अतिवाचाळपणा भोवणार, भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडीच्या हालचाली

0
1483
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात होऊ घातलेल्या आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकवेळा केलेली वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांचे निष्प्रभ ठरलेले नेतृत्व यामुळे महाराष्ट्रात भाजपची अनेक वेळा अडचण झाली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत होणारी ही संभाव्य अडचण दूर सारण्यासाठीच चंद्रकांत पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्याचे घाटत आहे. त्यांच्या ठिकाणी आशिष शेलार यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. या तीन पक्षाच्या एकोप्याचे परिणाम काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पहायला मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता आगामी काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या महत्वाच्या निवडणुकांत आपले अस्तित्व दाखवून देण्याचे मोठे आव्हान भाजप पुढे आहे. सध्या काँग्रेस स्वबळाचा नारा देत असली तरी ऐनवेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीपुढे भाजपचा निभाव लागणे तसे कठीणच आहे.

मुंबई, ठाणे आणि कल्याण- डोंबिलवली या महानगरपालिकांत शिवसेनेची असलेली सत्ता उलथवून टाकणे आणि औरंगाबादसारखी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली महानगरपालिका ताब्यात घेणे हे भाजप समोरील मोठे आव्हान आहे. जळगवा महानगरपालिकेत भाजपचे जास्त नगरसेवक असूनही ऐनवेळी सत्ता शिवसेनेच्या हातात गेली, याचे शल्यही भाजपला आहेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपला आता राज्यातील १० महानगपालिकांच्या निवडणुकांना सामोर जायचे आहे.

महाविकास आघाडीचे आव्हान पेलून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आपले अस्तित्व राखण्यासाठी भाजपला अधिक आक्रमक, धोरणी, सक्रीय आणि मुत्सद्दी प्रदेशाध्यक्षाची गरज भासू लागली आहे. चंद्रकांत पाटील ही गरज पूर्ण करू शकत नाहीत, अशी भाजप पक्षश्रेष्ठींची धारणा बनली आहे. त्यातूनच चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्याचे घाटत असून राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत भेटीगाठी सुरू केल्याचे सांगितले जाते.

चंद्रकांत पाटील यांच्या एकूणच कार्यशैलीमुळे महाराष्ट्रात भाजपला आशादायक यश मिळवता आलेले नाही. त्यामुळेच तरूण आणि आक्रमक नेता अशी प्रतिमा असलेले आशिष शेलार यांची भाजप प्रदेशाध्यपदी वर्णी लावण्याचे घाटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस आणि शेलार यांनी दिल्लीत भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेतल्याचे सांगितले जाते.

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची जवळीक आहे. फडणवीसांच्या बरोबरीने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणे टीका करण्यात शेलार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांचा अनेक वेळा तोल ढळतो, तसा तोल आशिष शेलार ढळू देत नाहीत. मुंबईतील वांद्रे पश्चिमचे भाजप आमदार असलेल्या शेलारांनी मागच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून आपले नेतृत्व सिद्ध करत भाजपला शिवसेनेच्या बरोबरीने मते मिळवून दिली आहेत. त्या उलट चंद्रकांत पाटलांना त्यांचे गावही स्वतःकडे राखता आलेले नाही. त्यामुळेच आशिष शेलार हा प्रदेश भाजपचा नवा चेहरा म्हणून समोर आणला जाईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा