मुंबईः असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात भाजपला टोला लगावला.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विरोधी पक्षांना जोरदार टोले लगावले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करून सरकारही स्थापन केले होते. मात्र ते सरकार औट घटकेचे ठरले आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने अजित पवारांनी आज विधानसभेत सादर केला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारा आणि काय कमतरता राहिली याचा विचार करा, असा सल्ला भाजपला देऊन टाकला. देश पातळीवरील आर्थिक स्थितीचे परिणाम राज्यातही दिसत आहेत. मंदीमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले आहेत. उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही सवलती राज्य सरकार देत आहे. देशाचा विकासदर पहिल्यांदाच पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. मंदीमुळे आधीच तणावाखाली असलेली बाजारपेठ आणखी तणावाखाली आली आहे, असे पवार म्हणाले.