सामंतांकडूनच दिशाभूल?: हिवाळी अधिवेशनात १५ दिवसांत एफआयआरचे आश्वासन, आता फक्त…

0
257

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे १२७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात सर्वच पातळ्यांवर टोलवाटोलवी केली जात आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चौकशी करून १५ दिवसांत दोषींवर एफआयआर नोंदवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. हाच मुद्दा पुन्हा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी उपस्थित झाल्यावर सामंत यांनी दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे फक्त आश्वासन दिले. त्यामुळे या विद्यापीठातील घोटाळाप्रकरणी उच्च शिक्षणमंत्र्यांकडूनही विधिमंडळाची दिशाभूल तर केली जात नाही ना?, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे १२७ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रश्न २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे आश्वास तत्कालीन उच्च शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने  या प्रकरणाची संपूर्ण सत्यता पडताळून पाहण्यासाठी डॉ. आर. एस. धामणस्कर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला तेव्हाच सादर केला.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 याच घोटाळ्याबाबत डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर १५ दिवसांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. उच्च शिक्षणमंत्र्यांनी विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनावर पंधरा दिवसात तर सोडाच तब्बल अडीच महिन्यांनंतरही दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला नाही किंवा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील घोटाळाप्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मोघम आश्वासन दिले. डॉ. धामणस्कर समितीच्या अहवालात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, अशी सूचना विद्यापीठास देण्यात येत आहे, असे सामंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण वारंवार विधिमंडळात उपस्थित होत आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २०२१ च्या डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसताना पुन्हा या प्रकरणी विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नावरही ते कारवाई केली जाईल, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळाला दिलेल्या आश्वासनावरच जर कारवाई होत नसेल तर ही विधिमंडळाची दिशाभूल नव्हे काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नेमका काय आहे घोटाळा?: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे १२७ कोटींच्या घोटाळाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ. आर. एस. धामणस्कर समितीने सादर केलेल्या  अहवालानुसार, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडील संलग्नीकरण शुल्क वसुलीची नोंदवही अद्ययावत नाही. त्यामुळे १७.९६ कोटी रुपयांच्या नोंदीच घेण्यात आलेल्या नाहीत. विद्यापीठातील विविध विभागांनी विनानिविदा केलेल्या खरेदीची रक्कम २६.५२ कोटी रुपये आहे. विद्यापीठातील विविध विभागांनी सदोष खरेदी प्रक्रिया राबवून चढ्या दराने खरेदी करून विद्यापीठाच्या निधीचे ६.८६ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. विविध विभागांनी सदोष प्रक्रियेद्वारे ४.६७ कोटी रुपयांचे अतिरिक्त प्रदान केले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

विद्यापीठातील विविध विभागांनी सदोष खरेदी प्रक्रिया राबून केलेल्या गंभीर अनियमिततेद्वारे १.४८ कोटींची खरेदी केली आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांनी खरेदी प्रक्रियेमध्ये किमान निविदा, दरपत्रके प्राप्त नसताना केलेल्या खरेदीची रक्कम ७.७३ कोटी रुपये आहे. परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे यांचा साठा नोंदवह्यातील नोंदीही संशयास्पद आहेत. विद्यापीठाने धामणस्कर समितीला ६६.९७ कोटी रुपयांच्या खरेदीचे अभिलेखेच सादर केलेले नाहीत, असे डॉ. धामणस्कर समितीच्या अहवालात म्हटले आहे. धामणस्कर समितीच्या चौकशी अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आणि या विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन विभागप्रमुख डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह अनेक विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा