खोटे बोलून लाट येते, सत्ता मिळते पण ती टिकत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोदींना फटकारे

0
272
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः खोटे बोलून लाट येते, सता मिळते पण ती टिकवणे कठीण असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना टोला लगावला. शेंडी- जाणव्याचे हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले नाही. बाबरी मशीद पाडली तेव्हा येडे गबाळे पळून गेले मात्र बाळासाहेब उभे राहिले. काश्मीरमध्ये पीडीपीच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगली, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते?, असा जळजळीत सवाल करत ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. सरदार पटेल असतील नाही तर सावरकर असतील, सर्वच महापुरूषांना भाजप आपले म्हणते, पण प्रत्यक्षात कृती वेगळीच केली जाते. आता गुजरातमध्ये सरदार पटेलांचे नाव बदलून स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. म्हणजे आता भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, असे म्हणायला हरकत नाही. आम्ही विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि त्यांनी सरदार पटेलांचे नाव पुसून टाकले आहे, हा आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले.

…जो झूठ बोले उनकी खत्म करो बेईमानीः औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला पण केंद्र सरकारने तो अडवून ठेवला आहे. केवळ भारत माता की जय म्हटले म्हणजे देशप्रेम सिद्ध होत नाही. संघमुक्त भारताची हाक देणाऱ्या नितीश कुमारांना आज तुम्ही डोक्यावर घेतले आहे. हे तुमचे हिंदुत्व आहे, असा टोला लगावतानाच ‘मेरे वतन के लोगो कविता ऐकवलीत… मी म्हणेन ए महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झूठ बोले उनकी खत्म करो बेईमानी’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राप्रमाणे रिकामी थाळी वाजवायला लावली नाहीः महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुले गरिबांची पोटे भरली. महाविकास आघाडी सरकारने गरिबाला भरलेली थाळी दिली. केंद्र सरकारप्रमाणे रिकामी थाळी वाजवायला लावली नाही. त्यामुळे भरलेली थाळी आणि रिकामी थाळी यातील फरक गरिबांना कळतो. आपल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले आहे. म्हणजे हे सगळे गरीब लगेच श्रीमंत झाले का? असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते पण आमची कामे मात्र यांना खुपतात, असेही ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा