राम मंदिरासाठी ३० वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? : नाना पटोलेंचा भाजपला सवाल

0
551
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे.  कोणत्या निधी कायद्यांतर्गत हे पैसे मागितले जात आहेत? काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत? प्रभू श्रीरामाने भाजपला कंत्राट दिले आहे का?  ३० वर्षांपूर्वी राम मंदिरासाठी जमा केलेला पैसा कुठे गेला? असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला.

नाना पटोले यांनी आज विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली. राम मंदिरासाठी पैसे मागितले आणि देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली अशी तक्रार आपल्याकडेही आली आहे. भगवान श्रीरामाच्या नावावर महाराष्ट्रात पैसे मागितले जात आहेत. त्यांना असे पैसे गोळा करण्याचा काय अधिकार आहे? राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या धर्मादाय संस्थेकडून घेतला जात आहे? राम मंदिरासाठी ३० वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला असे प्रश्न उपस्थित करत त्याचा हिशेब भाजपने द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली.

माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती आली होती. त्याने भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात असून मी दिले नाही तर धमकावले जात असल्याचे सांगितले. कोणत्या निधी कायद्यांतर्गत हे पैसे गोळा करत आहेत? रामाने यांना टोलवसुलीचे कंत्राट दिले आहे का? याचे उत्तर पाहिजे. रामाच्या नावाने पैसे गोळा करणारे हे कोण?  अशी विचारणा पटोले यांनी केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. यावेळी विरोधकांनी सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा