‘फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात’

0
56
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील  केंद्र सरकार घटना दुरूस्ती करणार याची माहिती असताना तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा उशीरा मंजूर केला. त्यामुळेच मराठा आरक्षणाचे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकले, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केले. चव्हाण यांच्या निवेदनावर विरोधकांनी हरकत घेतली. मात्र सभापतींनी हरकत नाकारल्यामुळे विरोधक संतप्त झाले आणि त्यांनी सभात्याग केला.

मराठा आरक्षणाबाबत आज मंगळवारी विधान परिषदेत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी निवेदन दिले. केंद्राने १८ ऑगस्ट २०१८ मध्ये १०२वी घटना दुरूस्ती केली. फडणवीस सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला. तत्कालीन सरकारला घटना दुरूस्ती माहीत अशताना देखील मराठा आरक्षणाचा कायदा उशिराने मंजूर केला. त्यामुळे मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे, असे चव्हाण म्हणाले. राज्य सरकारने या संदर्भात युक्तीवाद केला आहे. केंद्राने याबाबत खुलासेवार भूमिका घेतली पाहिजे. राज्यांचे आरक्षणाचे अधिकार काढून घेतले आहेत का? याचीही माहिती द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे चव्हाण म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना नोटीस बजावून त्यांना बाजू मांडण्यास सांगितले आहे. राज्यांना थेट आरक्षण देता येत नाही. तो अधिकार राज्य सरकारला नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. इंद्रा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ मार्चला होणार आहे. या सुनावणीवेळी २४ मार्चला मराठा समाजाच्या पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.मराठा समाजाने या संधीचा वापर करावा, असेही चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांच्या निवेदनावर हरकत घेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलण्याची परवानगी मागितली. मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवेदनावर बोलता येत नसल्याचे सांगत दरेकर यांना बोलण्याची परवानगी देण्यास नकार दिला. भाजपने यावर आक्षेप घेत सरकारविरोधी घोषणा देत सभात्याग केला आणि राज्य सरकारचा निषेध केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा