वीज कनेक्शन तोडणी मोहिमेला स्थगितीः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

0
1215
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना काळात पाठवण्यात आलेली वाढीव वीज बिले न भरल्यामुळे महावितरणमार्फत राबवण्यात येत असलेल्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. वीज बिलाबाबत पुढील निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज तोडू नका, असे आदेश पवार यांनी आज महावितरणला दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या दुसऱ्या दिवशी आज सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.  अजित पवारांच्या या घोषणेनंतर फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन केले. सर्वसामान्यांच्या वीज जोडणीसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा उपस्थित केला.

राज्यात वीज जोडण्या कापल्या जात आहेत. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना आणखी अडचणीत आणले जात आहे, असे सांगत फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. सभागृहातील गोंधळ वाढू लागल्याचे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

ताज्या बातम्यांसाठी न्यूजटाऊनचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा👇

https://t.me/newstown1

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा